दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना (CoronaVirus Lockdown) दिसत आहे. दिल्ली, गुजरातमध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा (Corona Patient Increase) वाढत आहे. तसेच अहमदाबादमध्ये नाईट कर्फ्यू सुरू केला असून सुरतमध्ये देखील ही चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत राहिला तर पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लादून दुसरा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
पुढील आठ दिवसात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या किती पटीने वाढतेय त्याचा आढावा महाविकास आघाडी सरकार घेणार आहे, अशी माहिती वडेट्टीवारांनी केली आहे. राज्यातील संख्या वाढली तर दिल्ली गुजरातवरून येणारी रेल्वेसेवा, बससेवा, विमानसेवा बंद करण्याबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असं देखील वडेट्टीवार म्हणाले.
कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आज राज्यात दुसरा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही. पण पुणे, औरंगाबाद, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय याचा आढावा घेऊ, एकूण संख्या किती वाढतेय ते बघून आम्ही पुढच्या आठ दिवसात निर्णय घेऊ. आवश्यकता पडली तर सगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावेच लागतील, असे संकेतही यावेळी देण्यात आलेत.
पूर्वीसारखी संख्या वाढली तर रेल्वेसेवा, विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावाच लागेल, कारण लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे काही निर्णय घेणे आवश्यक आहे आणि निर्णयाचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक राहिल.