डोंगरी इमारत दुर्घटना: स्थानिकांच्या तातडीने मदतीमुळे मुलाचे प्राण वाचले

स्थानिकांनी घेतली मदतीसाठी धाव

Updated: Jul 16, 2019, 03:30 PM IST
डोंगरी इमारत दुर्घटना: स्थानिकांच्या तातडीने मदतीमुळे मुलाचे प्राण वाचले title=

मुंबई : डोंगरी इथली इमारत कोसळल्यावर प्रत्यक्षदर्शींच्या अक्षरशः काळजाचा ठोका चुकला. अतिशय चिंचोळ्या गल्लीतही ही इमारत मोठा आवाज करत कोसळली आणि त्यात १५ हून अधिक कुटुंब ढिगाऱ्याखाली दबली. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांनी पहिल्या धक्क्यातून स्वतःला सावरत तातडीने मदतकार्याला सुरूवात केली. ढिगारे हाताने हटवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढायला सुरूवात केली. त्याचवेळी एका लहान मुलाला या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. या मुलाला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आलं. या मुलाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी तातडीने मदतीचा हात दिल्याने या मुलाचे प्राण वाचले.

डोंगरीमधली जी इमारत कोसळली, तो अत्यंत दाटीवाटीचा भाग आहे. अत्यंत चिंचोळ्या गल्ल्या तिथे आहेत. त्यामुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. अजूनही जवळपास ४० जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफकडून मदतकार्य सुरु आहे. 

मुंबईच्या डोंगरी परिसरात चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. डोंगरीच्या अब्दुल रहमान शाह दर्ग्याच्या मागे असलेली ही इमारत सुमारे १०० वर्षं जुनी होती. दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, कोसळलेल्या इमारतीचं नाव काय आणि ही इमारत नेमकी कुणाच्या मालकीची होती, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. सुरूवातीला केसरबाई ही म्हाडाची इमारत कोसळल्याची माहिती पुढं आली होती. मात्र दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई इमारत दुरूस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी झी २४ तासशी बोलताना दिलं. 

दरम्यान, दुर्घटनास्थळी अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान याठिकाणी लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.