Load shedding in maharashtra : ऊर्जामंत्र्यांनी केंद्र सरकार आणि अदानींवर फोडलं खापर

अदानींनी अचानक वीजपुरवठा कमी केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे

Updated: Apr 21, 2022, 09:25 PM IST
Load shedding in maharashtra : ऊर्जामंत्र्यांनी केंद्र सरकार आणि अदानींवर फोडलं खापर title=

मुंबई : महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात लोडशेडिंग (load shedding in maharashtra) कायम राहणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीच हे स्पष्ट केलं आहे. नितीन राऊत आणि मुख्यमंत्र्यांची लोडशेडिंगसंदर्भात बैठक झाली. लोडशेडिंगचं खापर ऊर्जामंत्र्यांनी केंद्र सरकार आणि अदानींवर फोडलं आहे. 

अदानींनी अचानक वीजपुरवठा कमी केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. जिकडे वसुली कमी, चो-या जास्त तिथे लोडशेडिंग केलं जाणार असल्याचं देखील ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे.

नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटलं की, 'देशात विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोड शेडिंग 9 मोठ्या राज्यात होतं आहे. महाराष्ट्र त्यापैकी 1 आहे. कोविड संपल्याचा परिणामही विजेची मागणी वाढण्यावर झालेली आहे. कोळसा मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवलं आहे.'

'केंद्रशासनाची नियोजनात चूक होतेय.  खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. माहीत नाही कधीपर्यंत हा तुटवडा राहणार आहे. लोडशेडिंगचं शेड्युल आम्ही लोकांना कळवू. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पाऊस पडला तर भारनियमन कमी होईल. ऑक्टोबर पर्यंत कसं प्लांनिंग असेल याची माहिती मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे.'

'g1, g2, g3 या ठिकाणी बिल भरलं जात नाही, चोऱ्या होतात, अशा ठिकाणी भारनियमन केलं जातं आहे. अदानी आणि gsw दोघांनाही नोटीस पाठवली आहे.' अशी माहितीही राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'वीज गळतीच्या बाबतीत बेजबाबदारपणा चालणार नाही. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वीजेचे संकट हे केवळ आपल्या राज्यातच नाही तर ते देशातील अन्य राज्यांतही आहे. त्यामुळे अन्य राज्ये करत असलेल्या उपाययोजना, वीज देवाण-घेवाण याबाबत माहिती घेण्यात यावी. वीज बचतीबाबत राज्यातील ग्रामपंचायतींपासून ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क करावे. सार्वजनिक ठिकाणच्या वीज वापराबाबत उधळपट्टी होणार नाही, याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि ऊर्जा विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत.'