Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि जगभरात ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा या गणेश उत्सव मंडळाची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. कारण, गणेश चतुर्थीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी असणार असून, त्याच धर्तीवर या गणेश उत्सव मंडळाची तयारी सुरू आहे. यादरम्यानच या मंडळामध्ये एका महत्त्वाच्या पदी, रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र (Anant Ambani) अनंत अंबानी यांचाही प्रवेश झाला आहे.
गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही तास शिल्लक असतानाच समोर आलेल्या बातमीनुसार अनंत अंबानींवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळातील पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय एकमतानं घेतल्याचं सांगण्यात आलं. अनंत अंबानींवर या मंडळाच्या वतीनं मानद सदस्य म्हणून जबाबजदारी सोपवण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाची एकंदर धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे.
लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाप्रती अंबानी कुटुंबाची आत्मियता आणि त्यांचा सेवाभाव यामुशं मंडळाच्या प्रगतीलाही वाव मिळाला असून, त्यामुळंही मंडळात अनंतच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती मुळात कोळ्यांचा गणपती म्हणून प्रसिद्ध होता. कोळी बांधवांनीच या गणपतीची सुरुवात केली असं सांगितलं जातं. यंदाच्या वर्षी हे गणेश उत्सव मंडळ 91 वं वर्ष साजरा करत असून, दरवर्षीप्रमाणं यंदाही बाप्पासाठी सुरेख आरास आणि भव्य मंडपाची उभारणी करत इथं येणाऱ्या भाविकांसाठीही दर्शन रांगेत कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.