दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : संजय निरुपम यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांची आज पक्षात घरवापसी होतेय. आज दुपारी १२.०० वाजता ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. 'मातोश्री' येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतोय. कमलेश राय यांच्या घरवापसी मागे शिवसेनेची आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर भारतीय मतपेढीचं समीकरण आणि संजय निरुपम यांना शह देण्याची व्यूहरचना असल्याची चर्चा आहे. राय यांच्या पत्नी सुषमा ह्या अंधेरी पूर्व मरोळ येथील काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत.
- शिवसेनेचे मुंबईतील सर्वात पहिले उत्तर भारतीय शाखाप्रमुख
- शिवसेनेचे माजी नगरसेवक
- शिवसेनेत असताना संजय निरुपम यांचे खंदे समर्थक
- निरुपम यांनी २००५ साली शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर राय यांनीही शिवसेना सोडली आणि निरुपम यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला
- काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २००७ मध्ये निरुपम यांनी कमलेश राय यांना महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी मदत केली... तेव्हा ते नगरसेवकही झाले
- पण त्यानंतर मात्र निरुपम आणि कमलेश राय यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले
- २०१२ साली महापालिका निवडणुकीत कमलेश राय यांनी केंद्रीय पक्षश्रेष्ठींबरोबर असलेला स्वतःचा संपर्क आणि गुरुदास कामत यांच्या मदतीनं उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं... आणि ते पुन्हा एकदा नगरसेवक झाले
- यंदा महापालिका निवडणुकीत अंधेरी पूर्व मरोळ येथील त्यांचा वॉर्ड महिला उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने आता त्यांच्या पत्नी सुषमा या तिथं नगरसेविका आहेत
- कमलेश राय हे मुंबईत उत्तर भारतीय समाजात मोठं प्रस्थ आहे... तसेच ते आर्थिक बाजूही मजबूत आहे
- अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी अयोध्यावारी केली... पण त्याचबरोबर मुंबईतील उत्तर भारतीय मतपेढीला चुचकारण्याचा प्रयत्न केला. कमलेश राय यांच्या घरवापसीमागे उद्धव ठाकरे यांची मुंबईतील उत्तर भारतीय मते मिळवणं ही व्यूहरचना आहे
- त्याचप्रमाणे निरुपम यांना शह देणं हादेखील उद्देश असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.