Kalyan Lok Sabha : महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कल्याण लोकसभेच्या जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुलाला उमेदवारी देता आली नाही अशी टीका केली होती. अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर होण्याआधीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिल्यास प्रचारात उतरणार नाही अशी भूमिका कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीनंतर भाजप पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस नागपूरला पोहोचले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. स्थापना दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा संकल्प केला आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू. जोपर्यंत वंचिताचा विकास होत नाही तोपर्यंत भाजपचा एक एक कार्यकर्ता काम करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"तीन पक्ष सोबत असल्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणे हे महत्त्वाचे आहे. आम्ही 33 जागा लढू असा कधीच दावा केला नव्हता. तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा लढल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळे ज्या जागा मिळतील त्यावर आम्ही समाधानी आहोत," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"जयंत पाटील यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत. एवढी मोठी निवडणूक सुरु असताना राष्ट्रवादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार दिसतात. जयंत पाटील आहेत कुठे?" असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.
"कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्यावेळी पेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही सगळे त्यांना निवडूण आणेल," असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
भाजप कार्यकर्त्यांचा श्रीकांत शिंदेंना विरोध
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा उमेदवार असेल तरच काम करू अशा प्रकारची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही भूमिका घेण्यात आली. याशिवाय कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप पक्षाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येतंय. दरम्यान या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली. शिवसेनेबद्दल भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने ही भूमिका घेतल्याचं चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असं वाटण्यात काही गैर नाही, मात्र पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करणार असल्याचं भाजपाने स्पष्ट केले आहे.