कर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

आम्ही कर्ज काढू पण अटी मान्य करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

Updated: May 27, 2020, 06:47 PM IST
कर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर title=
संग्रहित फोटो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्राने राज्य सरकारला आतापर्यंत किती, कोणत्या प्रकारे मदत केली याचा लेखाजोगा मांडला. मात्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे मदत राज्याला मिळाली नसून फडणवीस केवळ मोठंमोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आघाडी सरकारकडून करण्यात आला आहे. मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज काढण्याबाबत सांगितलं. मात्र कर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या असल्याचं म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही कर्ज काढू पण अटी मान्य करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. मदत देत नाही, कर्ज देताय तेही अटी घालून देत असल्याचं ते म्हणाले. कर्ज काढण्यापेक्षा, केंद्र सरकार अडचणीत काय मदत करणार हे महत्त्वाचं आहे. पत्र पाठवूनही पण मदत दिली नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. 

जीडीपीच्या ३ टक्क्यांवरून ते ५ टक्के करताना केंद्राने अटी घातल्या आहेत. पहिली अट शेतकऱ्याला वीज देता ती मोफत अथवा सबसिडीत देऊ नका, ती बंद अथवा कमी करा, कामगारांना जे संरक्षण आहे ते कायद्यात बदल करुन काढा ही एक अट आहे.

वन नेशन, वन रेशन ही अट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदल करा, मालमत्ता कर रेडी रेकनरप्रमाणे करा अशी एक अट आहे. केंद्राने घातलेल्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

एन ९५, वेंटीलेटर राज्याला मिळालेच नाहीत- जयंत पाटील