दलित मुलांची नग्न धिंड : 'भाजपची दलितविरोधी विचाराधारा कारणीभूत'

मातंग समाजाच्या दोघा मुलांची नग्न धिंड 

Updated: Jun 15, 2018, 09:53 AM IST
दलित मुलांची नग्न धिंड : 'भाजपची दलितविरोधी विचाराधारा कारणीभूत' title=

मुंबई : जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात घडलेल्या महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केलंय. भाजपची दलितविरोधी मनुवादी विचाराधारा यांसारख्या घटनांना कारणीभूत असल्याची टीका त्यांनी सरकारवर केलीय.

'विहिरीत पोहले म्हणून मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून मारहाण करणे व त्याचा व्हिडिओ बनवणे, ही पुरोगामी महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. भाजपचे सरकार आल्यापासून वारंवार अशा घटना घडत आहेत. भाजपची दलितविरोधी मनुवादी विचारधारा याला कारणीभूत आहे' अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.  

 

अल्पवयीन मुलांची नग्न धिंड 

जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावात, मनाई केल्यावरहही मालकाच्या शेतातील विहिरीत पोहल्याने बारा ते पंधरा वर्षे वयोगटाच्या मातंग समाजाच्या दोघा मुलांची नग्न धिंड काढली गेली. इतकंच नाही तर त्यांना कंबरेचा पट्टा आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली... आणि या घटनेचा व्हिडिओही बनवला गेला... मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दोघांना अटक

सुरुवातीला या प्रकरणी अटकेसाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी आता दोघांना अटक केलीय. सुरूवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळटाळ करण्यात आल्याचा आरोप होतोय. मात्र माध्यमांमधून टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर पोलिसांची पळापळ सुरू झाली. मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं ही अमानुष मारहाण केल्याचं पुढं आलंय. मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे ही दोघं मुलं कामाला होती. मारहाण करणाऱ्या प्रल्हाद कैलास लोहार आणि ईश्वर बळवंत जोशी या दोघांना अटक करण्यात आलीय. दोघांवर अॅट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.