Kirit Somaiya : कोणी लिहिलं मुंबईच्या रस्त्यावर 'भाग सोमय्या भाग'

किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांचं पथक सोमय्यांच्या घरी

Updated: Apr 12, 2022, 02:00 PM IST
Kirit Somaiya : कोणी लिहिलं मुंबईच्या रस्त्यावर 'भाग सोमय्या भाग' title=

मुंबई : सेव्ह विक्रांत (INS Vikrant) कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.  त्यामुळं त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यातच आता आर्थिक गुन्हे शाखा सोमया पितापुत्रांना नोटीस पाठवण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या उद्या हजर न राहिल्यास मोठी कारवाई होण्याचा अंदाज व्यक्त केला जाता आहे. 

सोमय्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आलीय.  या पथकांनी किरीट सोमय्यांचा कसून शोध सुरू केलाय. किरीट सोमय्यांचं कार्यालय, निकटवर्तीय आणि इतर ठिकाणी पथकं भेटी देत आहेत. 

'भाग सोमय्या भाग'
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या हे सध्या नॉट रिचेबल आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पळता कशाला, चौकशीला सामोरं जा असं आव्हान केलं आहे. त्यातच आता किरीट सोमय्या यांच्या निवासी कार्यालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर सोमय्यांना उद्देशून काही वाक्य लिहिण्यात आली होती.

रात्रीच्या वेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर घेऊन काही अज्ञातांनी 'भाग सोमय्या भाग' असं रस्त्यावर लिहिलं. त्यानंतर पोलिसांनी सफेद रंगाने ही वाक्य खोडून टाकली. हे कोणी लिहिलंय याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांही ही वाक्य खोडून टाकली असली तरी याची चांगलीच चर्चा रंगली.

संजय राऊत यांचं सोमय्यांना आव्हान
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना आव्हान केलं आहे. आम्ही कधीही राजकीय सूडापोटी आरोप करत नाही. तुमच्या मनात भीती नसेल तर पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे, तुम्ही अटकपूर्व जामीनासाठी जाताय, तुम्ही पळताय, भूमीगत होताय, तुम्ही इतके महात्मा आहात, आतापर्यंत अनेकांच्या भ्रष्टाचारावर हल्ले केलेले आहे, तुम्ही लोकांना प्रेरणा दिलेली आहे, कायद्यापासून पळू नका, आता तुम्हीच पळताय, xxx पाय लावून, असं पळू  नका, माझे त्यांना आव्हान आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

58 कोटींचा आकडा समोर आलेला आहे. तुम्ही म्हणताय 11 हजार रुपये. हा पोलीस तपासाचा भाग आहे. पण अनेक प्रकरणं समोर येतील, लोकांना ब्लॅकमेल करुन, ईडीच्या धमक्या देऊन, थायलंड, बँकॉकमध्ये कोणाकडून आणि किती पैसे जमा केले ते लवकरच समोर येईल असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला आहे.