राज ठाकरेंनी आवाहन केलेली रेल्वे भरती नेमकी काय? कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

Railway Recruitment: रेल्वे भरतीअंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5,696 जागा भरण्यात येणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Jan 29, 2024, 08:25 PM IST
राज ठाकरेंनी आवाहन केलेली रेल्वे भरती नेमकी काय? कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या  title=
Indian Railway Recruitment

Railway Recruitment: बेरोजगार मराठी तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत मराठी मुलांना नोकरी मिळावी यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः पुढे सरसावलेत. मराठी तरुणांना त्यांनी नेमकं काय आवाहन केलंय? तसेच या भरतीअंतर्गत किती पदे भरणार? याचा तपशील जाणून घेऊया. भारतीय रेल्वे मंत्रालयात सहाय्यक लोको पायलट पदासाठी ही मेगा भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे तसेच दैनिकांमध्ये जाहीरातही देण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत बेरोजगार मराठी तरुणांनी अधिकाधिक अर्ज करावेत, यासाठी राज ठाकरे स्वतः पुढं सरसावले आहेत. एक्स या सोशल मीडियावरून त्यांनी मराठी तरुणांना भरतीसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलंय.

पदाचा तपशील 

रेल्वे भरतीअंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5,696 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवार फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक आणि समकक्ष आयटीआय उत्तीर्ण असावा. मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअरींग डिप्लोमाधारक या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

अर्जाची शेवटची तारीख 

18 ते 30 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. मागासवर्गीय उमेदवारांना यातून सवलत देण्यात आली आहे.   19 फेब्रुवारी 2024  ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.rrbmumbi.gov.in वर अर्ज भरु शकतात. 

मनसैनिकांनी नुसतंच बघा वेबसाईट असं म्हणून चालणार नाही.. तर मराठी मुलांसाठी संपूर्ण मार्गदर्शन करावं, अशा सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या आहेत... या सूचना शाखाशाखांवर, संपर्क कार्यालयांमध्ये लावाव्यात. हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशा द्यायच्या ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण नोकरी कशी मिळवतील, याकडं डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

कधीकाळी कल्याणध्ये रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला होता. रेल्वे भरतीची माहिती महाराष्ट्रातील स्थानिक बेरोजगार तरुणांना दिली जात नाही, असाही त्यांचा आक्षेप होता.. आता रेल्वे भरती बोर्डानं मराठी भाषेत जाहिराती दिल्यात. त्यामुळंच मराठी तरुणांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत, यासाठी राज ठाकरेंनी यात जातीनं यात लक्ष घातलंय.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा