मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात दररोज ३० मुलांचं अपहरण होत असल्याचा अहवाल cry या संस्थेनं नुकताच दिला आहे. या अहवालानुसार लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र देशभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षीपेक्षा महाराष्ट्रात यंदा लहान मुलांच्या गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे.
लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि बिहार या राज्यांच्या यादीत आता महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारीमधे महाराष्ट्र देशभरात पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आलाय. राज्यात दररोज असे ५० गुन्हे घडतात. सरकारने २०१८ मधील मुलांबाबतच्या गुन्हेगारीचा अहवाल सादर केला आहे. त्याचं विश्लेषण cry संस्थेने केलंय.
२०१८ मध्ये अपहरण आणि जबरदस्तीने मुलामुलींना पळवून नेल्याच्या एकूण १० हजार ११७ घटना घडल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत या गुन्ह्यांमध्ये १५.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०१८ मध्ये लहान मुलांच्या गुन्ह्यांच्या १० हजार ६२३ घटनांची नोंद झाली आहे. यातील ६ ते १२ वयोगटातील १ हजार ११९ मुलं, १२ ते १६ वयोगटातील ४ हजार २२२ मुलं, १६ ते १८ वयोगटातील ५ हजार २८२ मुलं आहेत.
विशेष म्हणजे अपहरण करण्यात आलेल्या बालकांपैकी ७२ टक्के या मुली आहेत.
लहान मुलांबाबतच्या गुन्हेगारीची ही आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही बाब नक्कीच शोभनीय नाही. लहान मुलांबाबतचे गुन्हे रोखण्याचं प्रमुख आव्हान हे पोलिसांप्रमाणेच राज्यातील नागरिकांचंही आहे.