फडणवीस सरकारने आरोग्य सुविधा उभारल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती- शिवसेना

विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. 

Updated: Sep 5, 2020, 08:36 AM IST
फडणवीस सरकारने आरोग्य सुविधा उभारल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती- शिवसेना title=

मुंबई: पुण्याच्या जम्बो रुग्णालयांतील असुविधांवरून महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज तात्पुरत्या सुविधा जम्बो म्हणून उभाराव्या लागल्या, ते प्रमाण कमी झाले असते, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला.

पुण्याची चिंता वाढवणारी बातमी, शहरात बधितांची आकडा लाखाच्या पुढे

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून या सगळ्याविषयी सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत. त्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवायला हवे. आणीबाणीच्या स्थितीत दुर्दैवाने अनेक गोष्टी काही काळ नियंत्रणाबाहेर जातात, पण परिस्थितीवर नियंत्रण आणून पुन्हा सगळे स्थिरस्थावर करणे हाच राज्यकर्त्यांचा पुरुषार्थ ठरतो. पुण्यात आरोग्यव्यवस्था कोलमडली  आहे व सरकार किंवा महानगरपालिका अपयशी ठरत आहे, असे रोज बोंबलण्याने काही पक्षांना राजकीय प्रसिद्धी मिळेल. पण अशाने कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या यंत्रणांचे खच्चीकरण होत असते. पुण्यातील महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरात भाजपचे आमदार, खासदार आहेत. या सगळ्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी एकदिलाने काम केले तरच कोरोनाशी लढता येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

कोविड सेंटर उद्घाटनाची घाईच झाली; महापौर मुरलीधर मोहोळ यांची कबुली

तसेच विरोधकांच्या या आरोपांच्या राजकारणामुळे पुण्यातील वैद्यकीय सुविधा कोलमडण्याचा धोकाही 'सामना'तून व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभे राहिल्यापासून विरोधकांनी आरोप करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या वॉर्डात काम करायला आधीच कर्मचारी वर्ग मिळत नाही. त्यामुळे जे आहेत त्यांची मानसिक शांतता टिकवणे आवश्यक आहे. वैद्यकीय यंत्रणेवर ताण आहे याचे भान न ठेवता वैद्यकीय यंत्रणा, सुविधा केंद्रच मोडून टाकणे हा प्रकार शेकडो रुग्णांच्या जीवावर बेतू शकेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.