मुंबई: अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते राहिलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नाही. त्यामुळे अजित पवार यांनी काढलेला व्हीप न पाळल्यास आपली आमदारकी रद्द होईल, ही भीती मनातून काढून टाका. तुमचे सदस्यत्व रद्द होणार नाही, याची जबाबदारी मी घेतो, असे सांगत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आश्वस्त केले. ते सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, सभागृहाच्या नवीन सदस्यांमध्ये शंका आणि गैरसमज निर्माण केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार यांची निवड केली होती. त्यामुळे अजित पवार यांनाच व्हीप द्यायचा अधिकार आहे. व्हीप न पाळल्यास सदस्यत्व रद्द होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, ज्या व्यक्तीला पक्षातील पदावरून दूर केले जाते त्या व्यक्तीला संबंधित पक्षासंदर्भात निर्णय घ्यायचा कोणताही अधिकार उरत नाही. आम्ही तज्ज्ञ आणि संसदीय कार्यपद्धतीच्या जाणकारांकडून याची खातरजमा करून घेतली आहे. त्यामुळे तुमची आमदारकी जाणार नाही, याची जबाबदारी मी घेतो, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांच्या मर्जीनं भाजपच्या प्रस्तावावर चर्चा- अजित पवारांचा दावा
तसेच यावेळी पवार यांनी भाजपवरही सडकून टीका केली. केंद्रात सत्तेत असलेल्यांनी बहुमत नसतानाही अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. संसदीय पद्धतीच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ कसा फासायचा, हे भाजपने दाखवून दिले आहे. यामुळे सत्तास्थापनेवरून अनेक राज्यांमध्ये अजूनही खटले सुरु असल्याकडे पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.