कोरोनाच्या भीतीमुळे अनेक आप्त एकमेकांपासून दुरावल्याची अनेक उदाहरणं ऐकायला मिळतात. पण कोरोनामुळे एक कुटुंब एकत्र आल्याची घटना दुर्मिळच. पण एका कुटुंबाच्या बाबतीत अशी घटना घडली आहे. कोरोनामुळे एका महिलेला तिचा बेपत्ता असलेला पती मिळाला. तोही तब्बल २० वर्षांनी.
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही कहाणी आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोलजवळच्या बर्नपूर गावातील सुरेश प्रसाद २० वर्षांपूर्वी घर सोडून दिल्लीला गेले. तेव्हा घरात दोन पुत्र, दोन मुली आणि त्यांची पत्नी उर्मिला प्रसाद राहत होते. सुरेश प्रसाद यांनी घर सोडलं आणि पुन्हा मागे वळून कधी घराकडे पाहिलंच नाही. काम शोधत ते दिल्लीत काश्मिरी गेटला पोहचले आणि तिथंच मजुरी करून आपला उदरनिर्वाह सुरु ठेवला. पुरेसे पैसे मिळत नसल्याने ते घरीही पैसे पाठवत नव्हते.
या २० वर्षांच्या काळात सुरेश प्रसाद यांनी आठ वर्षांपूर्वी केवळ दोन वेळा घरी पत्र पाठवून आपण जिवंत असल्याचं कळवलं होतं. पण आपण कुठे राहतो हे मात्र सांगितलं नव्हतं. त्यामुळे कुटुंबीय आणखीच दुःखी झाले आणि शेवटी त्यांनीही सुरेश प्रसाद परत येण्याची आशा सोडून दिली.
दोन महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा झाली. देशभरातील ठिकठिकाणच्या मजुरांना छावणीत ठेवण्यात आलं. दिल्लीतल्या एका शाळेत सुरेश प्रसाद यांची व्यवस्था करण्यात आली होती. दीड महिन्यानंतर प्रवासी मजुरांना जेव्हा त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी सुरु झाली तेव्हा सुरेश प्रसाद यांनाही घराकडे पाठवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.
बुधवारी दिल्लीतून निघताना लक्षात आलं की सुरेश यांच्याकडे ना कोणतंही प्रमाणपत्र होतं, ना कोणत्याही नातेवाईकाचा फोन नंबर. आसनसोलमध्ये त्यांना सेंट्रल क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. पण सुरेशने जेव्हा त्याच्या घरचा पत्ता सांगितला आणि कुटुंबीयांची अचूक माहिती दिली तेव्हा पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.
खूप वर्षांनी सुरेश प्रसाद यांच्या पत्नीला पतीबद्दल अचानक माहिती मिळाली तेव्हा तीदेखिल आश्चर्यचकित झाली. घरी जपून ठेवलेलं सुरेश यांचं प्रमाणपत्र घेऊन ती पोलिसांकडे गेली. सुरेश प्रसाद यांची तब्बल २० वर्षांनी भेट होणार म्हणून तिला प्रचंड आनंद झाला. सुरेश प्रसाद यांची मुलंही खूष झाली. कोरोनामुळे तब्बल २० वर्षांनी सुरेश प्रसाद यांचं कुटुंब एकत्र आलं.
कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. संपूर्ण जग कोरोनाला घाबरलं आहे. पण प्रसाद यांच्या कुटुंबीयांना मात्र कोरोनामुळे २० वर्षांपूर्वी घर सोडून गेलेले सुरेश परत मिळालेत. याला नियतीचा खेळ म्हणायचा की कोरोनाची कमाल? सुरेश प्रसादच जाणो....