सातारा : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी घेतला. या निर्णयावरुन राज्याचं राजकारणाला चांगलीच 'किक' बसली. या निर्णयावरुन चौफेर टीका करण्यात आली. या निर्णयाचा विरोध करताना ज्येष्ठ किर्तनकार बंड्यातात्या कराडकर यांनी वादग्रस्त विधान केलं. या विधानावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. (housing minister jitendra awhad critisize kirtankar bandyatatya karadkar)
काय म्हणाले आव्हाड?
"एका किर्तनकाराच्या तोंडून अशा प्रकारची भाषा येणं यामुळे तो किर्तनकार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. बंड्यातात्यांची मुळं कुठे आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे वागत आहेत. यात मनावर घेण्यासारखं काही नाही", असं आव्हाड यांनी नमूद केलं.
पंकजाताई असो किंवा सुप्रियाताई असो एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची किंवा वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते वारकरी आहेत की नाही हे तपासण्याची फार पूर्वीपासून गरज होती. मात्र त्यांना आता पुन्हा त्यांच्या वक्तव्यातून सिद्ध करुन दिलं की मी कोण आहे", अशा शब्दात आव्हाडांनी मार्मिक शब्दात टीका केली.
कराडकर काय म्हणाले होते?
"हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत", असं बंड्यातात्या म्हणाले.
दरम्यान वादग्रस्त विधान केल्यानंतर अखेर बंडातात्या यांनी माफी ही मागितली. "माझं चुकलं असेल तर क्षमा मागायला मी तयार आहे, चुकीचं वाक्य बोललं गेलं असेल तर क्षमा मागायचा कमी पणा कुठला आहे, असं म्हणत बंडातात्या कराडकर यांनी प्रकरण आवरतं घेतलं.