'अतिरेकी नाही... मग मनसे नेत्यांचं काय करायचं? गृहमंत्री विचारतायत

अतिरेकी शोधून काढण्यासाठी 'धरपकड मोहीम' राज्य सरकारने कधी राबवली होती का? राज ठाकरेंचा सवाल  

Updated: May 10, 2022, 07:16 PM IST
'अतिरेकी नाही... मग मनसे नेत्यांचं काय करायचं? गृहमंत्री विचारतायत title=

मुंबई : मनसे (MNS) कार्यकर्त्यांवरच्या कारवाईमुळे संतापलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांना पत्र लिहित गर्भित इशारा दिला आहे. मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी 'धरपकड मोहीम' राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रात विचारला होता.

यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. आरोपीला शोधणं हे पोलिसांचा कामच आहे,  पोलीस आपलं काम करत आहे, ज्या मनसे नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे, पोलिसांसमोर उपस्थित झाले पाहिजे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. 

तसंच मनसे नेत्यांसोबत कशी वागणूक केली पाहिजे याचं मार्गदर्शन आता राज ठाकरे यांनी करावं असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला. पोलीस कायद्याप्रमाणे आपलं काम करत असतात, त्यामध्ये काहीही चुकीचं नाही, पोलीस आपल्या पद्धतीनेच काम करणार, त्यामुळे कोणीही नाराज होण्याचं कारण नाही, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

राज ठाकरेंच्या पत्रात काय?
गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी 'धरपकड मोहीम' राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? 

आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले 'रझाकार' आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.