Holi 2024 : येत्या रविवारी म्हणजे 24 मार्चला होळी आणि सोमवार 25 मार्चला धुलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. रंगांची उधळण आणि आनंदाच्या या सणाची लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाात असतात. हिंदू धर्मात सण उत्सवाला महत्त्व आहे. होळीच्या दिवशी लाकूड (Tree) आणि शेणी जाळल्या जातात. होलिका या राक्षसाच्या दहनाचा उत्सव साजरा करण्यासाठी आग लावली जाते. हा विधी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे असं मानलं जातं. पण या दिवशी अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड केली जाते.
मुंबई मनपाने दिला इशारा
पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांच्या संवर्धनआवश्यक आहे. होळीच्या सणा निमित्त अवैध वृक्षतोड केली जाते. अशी वृक्षतोड पर्यावरणाला हाणीकारक ठरु शकते. त्यामुळे होळीच्या सणानिमित्त कोणीही अवैधपणे झाडांची कत्तल करु नये असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) केलं आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
तसंच 'होळी'च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचं आढळल्यास, सतर्क नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना आणि स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा महानगरपालिकेच्या 1916 या 'टोल फ्री' क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव जितेंद्र परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीनं केलं आहे.
'महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975' अंतर्गत कलम 21 अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये 1 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते.
आपल्या अवतीभवती असलेली निसर्गसंपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्यान अधीक्षक परदेशी यांनी केलं आहे.