मुंबई: समुद्राला सर्वात मोठी भरती, पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

या मोसमातली ही सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Updated: Jul 15, 2018, 12:37 PM IST
मुंबई: समुद्राला सर्वात मोठी भरती, पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा title=

मुंबई: येत्या २४ तासांत मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यानुसार आजही समुद्राला मोठी भरती असणार आहे. दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनी समुद्राला भरती येईल यावेळी ४. ९७ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.. या मोसमातली ही सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

भरतीच्या काळात पर्यटकांनी समुद्रकिनारी लाटांशी खेळू नये, मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. १५ ते १८ जुलै दरम्यान उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागानं वर्तवलाय. १६ जुलैला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात अतिवृष्टी होईल असा इशाराही हवामान खात्यानं वर्तवलाय.

राज्याचा मोठा भाग कोरडाठाक

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, राज्याचा मोठा भाग कोरडाठाक आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे. नंदुरबार आणि शिंदखेडा तालुक्यात तर पाऊसच पडला नाही. धुळे जिल्ह्यात सरासरी २००  मिलिमीटरही पावसाची नोंद झालेली नाही. नंदुरबार जिल्ह्याची स्थितीही सारखीच आहे. नंदुरबार तालुक्यात तर गेल्या दीड महिन्यात १०० मिलीमीटर तर शिंदखेडा टाळूंख्यात ८६ मिलीमीटर पाऊस पडलाय. अत्यल्प पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बैचेन आहे. तापी नदी सोडल्याचा एकही नदी नाल्याला पूर आलेला नाही. विशेष म्हणजे अशीच स्थिती राहिली तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल.