दहशतवाद्यांचा बुरखा फाटणार, मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर हायटेक कॅमेराची नजर

मुंबईतील रेल्वे स्थानकं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, त्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Updated: Oct 1, 2021, 10:42 PM IST
दहशतवाद्यांचा बुरखा फाटणार, मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर हायटेक कॅमेराची नजर title=

अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने 6 दहशतवाद्यांना अटक केली. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर (Mumabi Railway Station) बॉम्बस्फोट घडवण्याचा या दहशतवाद्यांचा कट असल्याचं उघड झालं होतं. यानंतर मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पश्चिम रेल्ववर (Western Railway) चर्चगेटपासून (Churchgate) विरारपर्यंत (Virar) जवळपास 2700 हायटेक कॅमेरे लावण्यात आलेत. 

त्यातल्या अत्याधुनिक तंत्रामुळे स्टेशनच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवणं सहज शक्य होणार आहे. या कॅमेऱ्यांमधील इंटीग्रेटेड सिस्टिममुळे मास्क किंवा बुरखा घातलेल्या व्यक्तीचीही सहज ओळख होईल. त्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपींना पकडणं सोपं होणार आहे.

रेल्वे स्थानकावर हायटेक कॅमेरे

यातील 450 कॅमेरे स्टेशनच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर बसवण्यात आलेत. पोलिस रेकॉर्डवरील एखादी संशयित व्यक्ती स्टेशन परिसरात आढळल्यास कॅमेरा फेस रिडिंग करून त्याची माहिती कमांड सेंटरला देईल. त्या व्यक्तीचा चेहरा आणि उपलब्ध डेटा मॅच झाल्यास कमांड सेंटरमधील अलार्म वाजेल. त्यानंतर संबंधित व्यक्तीची माहिती मुंबई पोलीस, ATS, रेल्वे पोलीस, CBI, IB तसच रॉ सारख्या यंत्रणांपर्यंत पोहचवली जाईल. त्यामुळे गुन्हेगाराला पकडण्यास मदत होईल. 

हे कॅमेरे म्हणजे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणार आहेत. त्यांनी आपली ओळख कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी या हायटेक कॅमेऱ्यांच्या नजरेतून त्यांची सुटका नाही, हे मात्र नक्की.