Mumbai Rains Updates : मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलचे झोडपून काढलं. शनिवारी मुंबईत 115.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या 48 तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. पहिल्याच पावसात मुंबईतल्या मान्सूनपूर्व तयारीचा यंत्रणांचा दावा मात्र फोल ठरला. किंग्स सर्कल, अंधेरी सबवेजवळ सखल भागात पाणी साचले. तर वाहतुकीलाही पाणी साचल्यानं मोठा फटका बसला.
मुंबईच्या जुहू बीचवर पोलिसांमुळे दोघांचे प्राण वाचले आहेत. जुहू बीच इथं बुडणाऱ्या दोघांना मुलांना मुंबई पोलिसांनी समुद्रातून बाहेर काढले आहे. 7 आणि 10 वर्षाची ही मुलं होती. सांताक्रूझ पोलीस स्टेशनचे हवालदार विष्णू बेळे यांनी तातडीने धाव घेत समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांना सुखरुपपणे बाहेर काढले. काही दिवसांआधी याच जुहू चौपाटीवर 5 मुले समुद्रात बुडाली होती. पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय होणार, वादळी पावसाचा इशारा
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरुच होती. रात्रीही चांगला पाऊस झाला. काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे अनेक परिसरात पाणी साचले. कालच्या मुंबईतील पावासने दोन बळी घेतले आहेत. गोवंडी परिसरात नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबई पालिका प्रशासनाचा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचा नालेसफाईची पोलखोल झाली आहे.
गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरामध्ये नाल्यामध्ये पडून दोन जणांचा मृत्यू झाला. रामकृष्ण( 25 ) आणि सुधीर दास (30) अशी मृतांची नावे आहे. दोघेही कंत्राटी सफाई कामगार असल्याचे समजते. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोघेही गोवंडी परिसरात नालेसाफाईचे काम करत होते. यावेळी ते नाल्यात पडले. या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढले. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.