राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरच आता फेरीवाले ठाण मांडणार

मुंबईतल्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दादरमधल्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरच आता फेरीवाले ठाण मांडणार आहेत.

Updated: Jan 16, 2018, 09:18 PM IST
राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरच आता फेरीवाले ठाण मांडणार  title=

मुंबई : मुंबईतल्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दादरमधल्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरच आता फेरीवाले ठाण मांडणार आहेत.

कृष्णकुंजघरासमोर हॉकर्स झोनचा डाव!

फेरीवाला धोरणानुसार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज घरासमोरचा आणि मागचा अशा दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन तयार करण्यात आलाय. दादरमधल्या एम. बी राऊत मार्ग आणि केळूसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी १० अशा एकूण  २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आलीय.

'हॉकर्स झोन नियमावलीचंही उल्लंघन'

मात्र, सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नसतांना येथे हॉकर्स झोन तयार करण्याची गरजच काय, असा प्रश्न विचारला जातोय. तसंच या परिसरात शाळा असल्यानं हॉकर्स झोन तयार करण्याच्या नियमावलीचंही उल्लंघन करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

घराबाहेर मुद्दाम फेरीवाल्यांना जागा ?

राज ठाकरेंनी एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधी मोहीम सुरू करत फेरीवाल्यांना सळो की पळो करुन सोडलं. यावरुन काँग्रेस आणि मनसेत मोठं राजकारणही रंगलं. मात्र, आता महानगरपालिकेनंच राज ठाकरेंच्या घराबाहेर मुद्दाम फेरीवाल्यांना जागा करुन दिल्याचं बोललं जातंय.

१ जानेवारीपर्यंत सूचना आणि हरकती 

दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाच्या आजुबाजूला मात्र हॉकर्स झोन प्रस्तावित नाहीय. महापालिकेनं हॉकर्स झोनमधील रस्त्यांची यादी यापूर्वीच जाहीर केली. मात्र येत्या ३१ जानेवारीपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्यावर विचार होऊन मगच यादी अंतीम होईल, असे सांगण्यात आलेय.

'कोणाला टार्गेट केलं जातं नाही'

मुंबईभरात जे अनावश्यक आणि त्रासदायक हॉकर्स झोन प्रस्तावित आहेत त्याबाबत उद्या कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत बैठक होईल. दरम्यान, महापौर विश्वानाथ माहाडेश्वर यांनी यावर प्रतिक्रिया दिलेय. कोर्टाच्या आदेशा नुसार तयार करण्यात आलेली समिती हॉकिंग झोन आणि नॉन हॉकिंग झोन ठरवत आहे. असं कोणाला टार्गेट केलं जातं नाही. कोर्टाचे आदेश पाळले जात आहेत.