जोक आवडला नाही म्हणून जीम ट्रेनरने मुद्गर उचलला अन्...; मुंबईच्या जीममधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबईच्या जीममध्ये (Mumbai Gym) ट्रेनरने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंदेने (Yogesh Shinde) केलेला एक जोक ट्रेनरला आवडला नाही आणि त्यामुळेच त्याने हल्ला केला.   

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2024, 03:18 PM IST
जोक आवडला नाही म्हणून जीम ट्रेनरने मुद्गर उचलला अन्...; मुंबईच्या जीममधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद title=

मुंबईच्या जीममध्ये (Mumbai Gym) एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, जीमच्या ट्रेनरनेच तरुणावर मुद्गरने हल्ला केला. ही घटना सासीटीव्हीत कैद झाली आहे. मुलूंडमध्ये हा प्रकार घडला आहे. योगेश शिंदेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोली याप्रकरणी तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीत दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंदे वर्कआऊट करत असताना ट्रेनर त्याला मदत करत होता. यावेळी थोड्या अंतरावर उभा असलेला ट्रेनर मुद्गर उचलतो आणि योगेश शिंदेच्या दिशेने चालत जातो. यानंतर काही वेळातच ट्रेनर मुद्गर योगेश शिंदेच्या डोक्यात घालतो. अचानक हल्ला झाल्याने सर्वजण आश्चर्याने पाहू लागतात. सर्वजण जीम ट्रेनरला योगेश शिंदेपासून दूर नेतात आणि रोखतात. दुसरीकडे योगेश शिंदे डोकं पकडून खाली बसतो. 

योगेश शिंदे याने आपला ट्रेनरशी कोणताही वाद नसल्याचं सांगितलं आहे. तसंच जेव्हा हल्ला झाला त्याच्या आधी तो आपल्याकडे रागाने पाहत होता अशी माहिती दिली आहे. आपण योग्य प्रकारे व्यायाम करत आहोत का अशी विचारणा मी त्याला केली होती, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. मात्र काही वेळाने हल्ला केला असं योगेश शिंदेने पोलीस तक्रारीत सांगितलं आहे. 

'द फ्री प्रेस जर्नल' ने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर योगेश शिंदेचं एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्याच्या कवटीच्या डाव्या बाजूला दोन फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंदेने (Yogesh Shinde) केलेला एक जोक ट्रेनरला आवडला नाही आणि त्यामुळेच त्याने हल्ला केला. पण हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.