मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निकाल उशीरा लागत असल्या प्रकरणाची कुलपती म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे.
एवढ्यावरच न थांबता ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याचे आदेशही, राज्यपालांनी 'कुलपती' म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांना दिले आहेत.
निकाल जाहीर करण्याबाबत विद्यापीठाच्या तयारीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचेही आदेश त्यांनी दिलेत. तसंच निकाल जाहीर करण्यासाठी वॉर रूम स्थापन करुन, कुलगुरुंनी त्यावर स्वत: देखरेख ठेवावी, असं त्यांनी म्हटलंय... आणि याबाबतचा अहवाल दररोज सादर करण्याचेही आदेश दिले गेलेत.
घेतलेल्या ४७७ परीक्षांपैंकी अवघ्या ५१ परीक्षांचेच निकाल मुंबई विद्यापीठानं घोषित केल्याबद्दलही राज्यपालांनी यावेळी तीव्र चिंता व्यक्त केली.
अद्याप ४२६ परीक्षांचे निकाल जाहीर व्हायचे बाकी आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार, परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर व्हायला हवेत. अपवादात्मक परिस्थितीत हा कालवाधी ४५ दिवसांचा असू शकतो. मात्र, मुंबई विद्यापीठाचे निकाल ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ रखडल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीवर परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.