मुंबई : महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी (Farmer) जी मदत जाहीर केली आहे. ती तुटपुंजी आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी १८ हजार रुपये मदत तुटपुंजी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (Shiv Sena) विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरीबांधवांना दिलासा मिळणार नाही, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मागणीनुसार नुकसान ग्रस्तशेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी २५ हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली. उद्धव यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून वाढीव मदत जाहीर करण्यात यावी, असे ते म्हणालेत. सोबतच, नुकसान झालेल्या शेतातील जुन्या पिकांचे अवशेष बाहेर काढणे, शेतातील गवत व इतर कचरा साफ करून रब्बी हंगामसाठी शेती पेरणीयोग्य करण्यासाठी मनरेगा, रोजगार हमीतून मदत करण्यात यावी, असेही ते म्हणालेत.
दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल. तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८,००० रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे.
तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत खूपच कमी आहे. मात्र, प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.