मुंबई: सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बुधवारी दुपारी मुंबई बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. समन्वयक समितीचे सदस्य वीरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत मराठा संघटनांची भूमिका सविस्तरपणे मांडली. यावेळी त्यांनी म्हटले की, मराठा समाज मुंबई बंद करु शकतो, हे आज सिद्ध झाले आहे. या बंददरम्यान मुंबईकरांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई आणि ठाण्यात आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाबद्दल विचारणा करण्यात आली असता वीरेंद्र पवार यांनी म्हटले की, या आंदोलनात राजकीय अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्यामुळे हे घडले, असावे असा आम्हाला संशय आहे. आम्ही त्यांचा शोध घेऊ. सरकारनेच
आमच्या हातात दगड आणि काठ्या दिल्या. तुम्हाला न्याय हवा असेल तर त्याचा वापर करा, असा संदेश सरकारकडूनच वारंवार देण्यात आला. त्यामुळे गेली दोन वर्ष शांतपणे मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजावर ठोक मोर्चे काढण्याची वेळ आली, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई बंद आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी ठाणे आणि नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
आम्ही त्यांनाही बंद मागे घेण्याची विनंती केल्याचे वीरेंद्र पवारांनी सांगितले. नवी मुंबई आणि ठाण्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. कळंबोली येथे पोलिसांना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांची गाडी पेटवली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.