मुंबई : येत्या १ फेब्रुवारीपासून राज्यात कुठल्याही सरकारी खात्याला कुठलीही खरेदी करता येणार नाही, असा आदेशच राज्य सरकारनं काढलाय. येत्या १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
वैद्यकीय खात्यातील औषध खरेदीला मात्र त्यातून वगळण्यात आलंय. अनेक सरकारी खाती वर्षभर कुठलीही खरेदी करत नाही. परंतु मार्च महिना आला की खरेदीची बिलं काढली जातात आणि घाईघाईत ती मंजूर केली जातात.
मार्चच्या उत्तरार्धात तर ओव्हरटाइम काम करून बिलं मंजूर केली जातात. या सगळ्या खरेदीत मोठा घोळ होत असल्यानं १ फेब्रुवारीपासून खरेदी बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळं प्रत्येक विभागाला येत्या १ फेब्रुवारीच्या आधी स्टेशनरी, टेबल, खुर्ची, साहित्य, संगणक, आणि इतर बाबीची खरेदी पूर्ण करावी लागणार आहे.