मुंबई : शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला भूमाफिया कारणीभूत असून त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.
तसंच संबंधित ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या १९९ हेक्टर जमिनीचे ऑडिट करण्याची मागणीही गोटे यांनी केली आहे. यामुळे सरकारने घेतलेली जमीन आधी कोणाच्या नावावर होती, मग कोणी खरेदी केली हे स्पष्ट होईल असंही गोटे यांनी सांगितलंय.
धर्मा पाटील यांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटलेत. या मुद्यावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना जाब विचारलाय. या प्रकरणामुळे सरकार बदनाम होत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी केल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलंय.
या बैठकीत धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुख्य सचिवांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले. प्रकरणाबाबत मुख्य सचिव यांना पूर्ण चौकशी करत पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत माहिती सादर करायला सांगितलंय. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच यावर राजकारण होऊ नये असा टोला मुनगंटीवारांनी शिवसेनेला लगावलाय.
अधिसूचित झालेल्या जमीन खरेदीवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविरोधात मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केली आहे. दोंडाईचा पोलीस ठाण्यात आणि कोर्टात ही तक्रार दाखल करण्यात आलीय.
नवाब मलिक यांनी केलेले आरोप व्यक्तीद्वेशातून असल्याचा प्रत्यारोप रावल यांनी केलाय. रावल हे भूमाफिया असून धर्मा पाटील यांच्या विखरण गावात रावल यांनी शंकरसिंह गिरासे यांच्याकडून अधिसूचित झालेली जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर केला.