मुंबई : म्हाडाच्या सोडतीत नुकतेच विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. या सोडतीत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील विजेते ठरलेल्यांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. या गटांमधील घरे तब्बल पाच टक्क्यांनी स्वस्त करण्यात आलीय.
म्हाडाच्या या निर्णयामुळे आता नव्या दराने ही घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडानं सोडतीपूर्वीच म्हाडाच्या घराच्या किंमतीत २५ ते ३० टक्क्यांनी कपात केली होती. त्यामुळे आता पाच टक्क्यांची कपात केल्यामुळे अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटाची घरं आणखीन स्वस्त झालीय. त्याच सोबत माहुल इथल्या राहिवाशांना म्हाडा तीनशे ट्रान्झिटची घरे मुंबईत उपलब्ध करून देणार आहेत.
२०१९ मध्ये म्हाडाच्या मुंबईतल्या घरांची संख्या दुप्पट होणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी तशी घोषणा केली आहे. म्हाडा कोकण मंडळाच्या पाच हजार घरांची जाहिरात जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान येणार आहे.
म्हाडाची घरे प्रामुख्याने वसई, वेंगुर्ले, मीरारोड, ठाणे येथे असणार आहेत. म्हाडाच्या एक हजार ३८४ घरांसाठीची संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यानंतर मेहता यांनी ही माहिती दिली.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील एक हजार 384 सदनिकांची सोडत निघाली. या सदनिकांसाठी विक्रमी म्हणजे १ लाख ६४ हजार अर्ज आले होते. म्हाडाच्या अत्यल्प प्रवर्गासाठी घराची किंमत २० लाख रुपये पर्यंत होती, तर अल्प उत्पन्न गटासाठी २० लाख ते ३५ लाख, मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ लाख ते ६० लाख आणि उच्च उत्पन्न असलेल्यांसाठी घराची किंमत ६० लाखांपेक्षा जास्त होती.
म्हाडाचे सर्वात कमी किंमतीचे घर १४ लाख ६२ हजारापर्यंत होते. तर उच्च उत्पन्न गटातील धवलगिरी कंबाला हिल येथील घराची किंमत सर्वाधिक ५ कोटी ८० लाखांच्या घरात होती.