Mumbai Local Train Update: मुंबईकरांची सारी भिस्त ही लोकलवर असते. लोकल चुकली किंवा लोकल उशीरा आली तर संपूर्ण वेळापत्रक बिघडते. कधी कधी तर लोकल प्लॅटफॉर्मला लागते वेगळी आणि फलाटावरील इंडिकेटरवर चुकीची माहिती देण्यात येते. अशावेळी नागरिकांचा खूप गोंधळ उडतो. नागरिकांना अशावेळी उद्घोषणेची वाट पाहावी लागते किंवा मग सहप्रवाशाला माहिती विचारावी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक उपाय शोधून काढला आहे.
मुंबईकरांचा प्रवास आमामदायी होण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून नेहमीच उपाययोजना आखल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वे आता लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावणार आहे. लोकलवरच्या डिजिटल डिस्प्लेवर प्लॅटफॉर्मवर लागलेली लोकल कोणती आहे व किती डब्ब्यांची आहे, हे प्रवाशांना समजणार आहे. एक्स्प्रेस ट्रेनप्रमाणे आता लोकलला डिजीटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर डिजीटल डिस्प्लेचा प्रयोग केला जाणार आहे.
मुंबई सेंट्रलच्या पश्चिम रेल्वेच्या ईएमयू कारशेडमध्ये एक नवीन हेड कोड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमुळं प्रवाशांना लोकल ट्रेन कुठे चालली आहे. किती डब्ब्यांची आहे तसंच स्लो आहे की फास्ट याची सर्व माहिती मिळणार आहे. या डिस्प्लेचं वैशिष्ट्य म्हणजे गार्ड सुरुवातीच्या स्थानकातच लोकलच नंबर टाकण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना त्या लोकलबद्दल आणि प्रवासाविषयी सर्व माहिती लोकलच्या डब्यावर असलेल्या डिस्प्लेवर कळणार आहे. डिजिटील डिस्प्ले 3 सेकंदाच्या अंतराने मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लोकलची माहिती सांगेल.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, डिजीटल डिस्प्ले एचडी स्वरुपात आहे. या डिस्प्लेवर काच लावण्यात आली आहे. प्रवाशांना स्क्रीवर हा कोड सहज बघता येईल. त्याचबरोबर या डिस्प्लेवरील अक्षरे देखील ठळक आहेत जी 5 मीटरपर्यंतच्या अंतरावरुनही दिसेल. सध्या एका रेकमध्ये डिस्प्ले सिस्टिम बसवण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक बाजूला चार डिजीटल डिस्प्ले असलेले एकूण आठ डिजीटल डिस्प्ले आहेत. पश्चिम रेल्वेवरील नागरिकांना या डिस्प्लेचा मोठा फायदा होणार आहे.
हे डिजिटल डिस्प्ले फुल एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) आहेत.
हे डिस्प्ले काचेने संरक्षित आहेत
त्याची ब्राइटनेसमुळं लोकांना स्क्रीनवर कोड सहज पाहता येईल
डिस्प्ले स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केला जातो जेणेकरून मजकूर 5 मीटरपर्यंतच्या अंतरावरून स्पष्टपणे दिसतो