Mhada Home : मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. यापैकी म्हाडाला विकासकांकडून प्राप्त झालेल्या 370 घरांच्या किंमतीत मोठी कपात (Reduction in Housing Prices) करण्यात आली आहे. म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील 370 सदनिकांच्या विक्री किंमतीत तब्बल 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलीये. म्हाडाच्या घरांच्या किंमती भरमसाठ असल्यानं मुंबईकरांनी याकडं पाठ फिरवली होती. खूपच कमी अर्ज आल्यानं आता म्हाडानं नोंदणीला मुदतवाढ दिली असून घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत.
याशिवाय मुंबई मंडळ सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीसाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढही देण्यात आलीये. म्हाडाच्या 'श्री आणि श्रीमती निवासी' शुभंकर चिन्हाचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिलीये.
पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला (MHADA) गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या 370 सदनिका संगणकीय सोडत प्रणालीतून विक्रीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील
अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 25 टक्क्यांनी कमी
अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 20 टक्क्यांनी कमी
मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी
उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितलं. यानुसार सुधारित किंमती मुंबई मंडळाद्वारे लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसंच प्रसिद्धी पत्रकांद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.
किंमतींमध्ये कपात केल्यानंतर म्हाडा सोडतीत अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 19 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. संगणकीय सोडतीच्या वेळापत्रकामध्ये झालेल्या बदलामुळे प्राप्त अर्जाच्या संगणकीय सोडतीचा दिनांक आणि ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केली जाणार आहे.
शुभंकर चिन्हाचं अनावरण
आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये नागरिकांशी सुलभ आणि पारदर्शक संवाद राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या 'श्री आणि श्रीमती निवासी' या शुभंकर चिन्हाचे (Mascot) अनावरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज म्हाडा मुख्यालयात करण्यात आलं. शुभंकर म्हणजे म्हाडाकरिता शुभेच्छा दूत प्रमाणेच भूमिका निभावणार आहेत. म्हाडा हे एक लोकाभिमुख कार्यालय असल्याने अनेक नागरिक या म्हाडाच्या विविध कार्यप्रणालीस भेट देत असतात. अशावेळी म्हाडाच्या कार्यप्रणालीची ओळख आणि मार्गदर्शन मिळविण्याकरिता नागरिकांना 'श्री आणि श्रीमती निवासी' यांच्याद्वारे या शुभंकरची मदत होणार असल्याचे अतुल सावे म्हणाले.
म्हाडाचा शुभंकर नागरिकांना त्यांच्या घरांच्या प्रवासात एक साथीदार म्हणून कार्य करतील. हे शुभंकर म्हाडाच्या योजनांची माहिती सुलभपणे पोहोचवण्याचे एक प्रभावी साधन ठरेल, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत अधिक मदत होईल.