एसटीतील महिला प्रशिक्षणार्थींना ६८०० रूपये विद्यावेतन द्या; इंटकची मागणी

महिला आरक्षणाद्वारे २१५ चालक तथा वाहक पदी महिला उमेदवारांची तसेच अदिवासी समाजातील २१ अशा एकुण २३६ महिलांची निवड करण्यात आलेली आहे. 

Updated: Sep 11, 2020, 06:42 PM IST
एसटीतील महिला प्रशिक्षणार्थींना ६८०० रूपये विद्यावेतन द्या; इंटकची मागणी title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळसेवा भरती सन-२०१९ अन्वये जाहीरात क्र.१/२०१९ व जाहीरात क्र.२/२०१९ नुसार ४५०० चालक तथा वाहक पदात निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महिला आरक्षणाव्दारे २१५ चालक तथा वाहक पदी महिला तसेच आदिवासी समाजातील २१ अशा २३६ महिला चालक तथा वाहक पदात प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाला देण्यात आलेली स्थगिती मागे घेऊन प्रशिक्षण कालावधीत किमान वेतन कायदा व शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार ६८०० रूपये विद्यावेतन  देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने केली आहे.

सदर भरती अंतर्गत महिला उमेदवारांकरीता त्यांची निवड झाल्यास अवजड वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर रा.प. महामंडळातर्फे एक वर्षे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना रा.प. महामंडळाच्या नियमानुसार विद्यावेतन देण्यात येईल. सर्व महिला उमेदवारांचे एक वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर अवजड वाहन चालविण्याचा नियमित परवाना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर रा.प. महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार त्यांची वाहन चालन चाचणी घेण्यात येऊन सदर चाचणीत उत्तीर्ण होणा-या महिला उमेदवारांना जाहीरातीत नमुद केलेल्या वेतनश्रेणीमध्ये नेमणुका देण्यात येईल अशी पाञता ठरविण्यात आली होती.

त्यानुसार महिला आरक्षणाद्वारे २१५ चालक तथा वाहक पदी महिला उमेदवारांची तसेच अदिवासी समाजातील २१ अशा एकुण २३६ महिलांची निवड करण्यात आलेली आहे. एस.टी. महामंडळामध्ये चालक तथा वाहक पदात पहिल्यांदाच महिला उमेदवारांना दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या माजी राष्ट्रपती महामहिम मा. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व नाटय सभागृह पुणे येथे तत्कालीन परिवहनमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आलेले होते परंतु एस.टी. महामंडळाने सदर महिला चालक तथा वाहक उमेदवारांना प्रशिक्षण सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत विद्यावेतन दिलेले नाही.

तसेच एस.टी. महामंडळात पहिल्यांदाच चालक तथा वाहक पदामध्ये महिला उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रा.प. महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार ४८ दिवसाच्या पुरुष चालकांना देण्यात येणारे विद्यावेतन लागू करणे अन्यायकारक असुन माणुसकीला काळीमा फासणारे आहे. सध्या रा.प. महामंडळात प्रति दिन प्रशिक्षणार्थीना ५ रुपये विद्यावेतन दिले जाते. किमान वेतन कायदा १९४८ व शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये रा.प. महामंडळातील अर्धकुशल तांत्रिक व्यवसायीक व आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांना १ वर्षे प्रशिक्षण कालावधीत किमान वेतन = मुळ वेतन अधिक विशेष भत्ता मिळून येणा-या रकमेच्या ७० टक्के रक्कम विद्यावेतन म्हणून दिले जाते. सध्या शासनाने परिमंडळ १ करीता रूपये ६८०३.३० तर परिमंडळ २ करीता रुपये ६६६३.३० इतके विद्यावेतन दिले जात असल्याचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

सध्या सरळ सेवा भरती २०१९ अंतर्गत २३६ महिला चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना कोणतेही विद्यावेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. याशिवाय ५ रुपये प्रतिदिन एक वर्षे प्रशिक्षण करण्यास विद्यावेतन देणे किमान वेतन कायदा व शिकाऊ उमेदवारी कायदा यामधील तरतुदींशी विसंगत आहे. सदर परिस्थितीत अत्यंत हालाखीचे जीवन जगण्याची वेळ गाजावाजा करून चालक तथा वाहक पदात भरती झालेल्या महिला प्रशिक्षणार्थीवर आलेली असुन त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

इंटकच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

१. चालक तथा वाहक पदातील ३२०० प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणाची स्थगिती मागे घेऊन प्रशिक्षण सुरू करावे.

२.महिला चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत ६८०० रूपये विद्यावेतन द्यावे.

३. राज्य संवर्ग १५० व ८२ अधिकारी पदातील प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणाची स्थगिती मागे घेऊन प्रशिक्षण सुरू करावे.

४.महिला चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षणार्थींना अवजड वाहन चालविण्याचा परवाना काढून द्यावा.

५. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालक तथा वाहक पदातील प्रशिक्षणार्थींना ज्या जिल्हातील रहिवासी आहेत त्या विभागात प्रशिक्षण द्यावे.