Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ह्याचे नाव घेऊन एका मुंबईतील एका तरुणीला सहा लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने चित्रपटात काम देतो अशी बतावणी करत एका तरुणीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीकडून बनवल्या जाणाऱ्या एका चित्रपटात अभिनयाची संधी देतो असं सांगून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीला सांगितलं की चित्रपटात तिची निवड करण्याच्या आधी तिचे पोर्टफोलिओ बनवावा लागेल. त्यासाठी तिचे फोटोशूट एका फोटोग्राफरकडून करुन घेतले जाईल. हा फोटोग्राफर बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनसाठीदेखील काम करतो. याच बहाण्याने त्याने तरुणीकडून सहा लाख रुपये मागितले होते. मात्र, त्याच्या एका चुकीमुळं तरुणीला संशय आला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
तरुणीच्या तक्रारीनुसार, जुहू पोलिसांनी आरोपी मेहरा उर्फ प्रिन्स कुमार सिन्हा याला एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. इथे आधीच पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार, तरुणी व तिचे वडिल आरोपीला भेटण्यासाठी आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी खार येथे राहते आणि तिला अभिनयाचा छंद आहे. ती सोशल मीडियावर तिचे फोटो सतत अपलोड करायची. 3 एप्रिल रोजी तिला एका अज्ञात नंबरवरुन फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने रोहन मेहरा अशी स्वतःची ओळख करुन दिली. तसंच, अक्षय कुमारच्या प्रोडक्शन कंपनीत कामाला आहे, असंही सांगितले.
आरोपीने तरुणीला सांगितले की, अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटासाठी तिला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. त्यानंतर तरुणीने प्रोजेक्टबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की चित्रपट निर्भया केस आणि महिला सशक्तीकरण याविषयावर आहे. त्यानंतर दोघांची ओळख झाली. दोघांची भेटही झाली. या भेटीत आरोपीने सांगितले की चित्रपटातील एका भूमिकेसाठी तिला निवडण्यात आले आहे आणि हे देखील सांगितले की तिला वजन कमी करण्याची गरज आहे. आरोपीने तरुणीला सांगितले की, तिला पोर्टफोलियो बनवण्याची गरज आहे आणि फोटोशूटसाठी तिला 6 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
आरोपीने सहा लाख रुपये देण्यास सांगितल्यानंतर तिने तिच्या वडिलांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अक्षय कुमारच्या कंपनीतील कोण्या एका व्यक्तीकडून पडताळणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अक्षय कुमारचा सहाय्यकासोबत तिने संपर्क केला. त्याने तरुणीला सांगितले की, कंपनीत रोहन मेहरा नावाची कोणतीही व्यक्ती नाहीये. या नावाची कोणतीही व्यक्ती अक्षय कुमारसोबत काम करत नाहीये. ही माहिती कळल्यानंतर तरुणीने लगेचच जुहू पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे.