घाटकोपर दुर्घटना : 'देव तारी त्याला कोण मारी'चा पुन्हा प्रत्यय

सिद्धीसाई इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १७ जणांचा मृत्यू झालाय.. पण जे वाचले त्यांच्याही कहण्या धक्कादायक आहेत. इमारतीत राहणाऱ्या वंदना सिंग आणि त्यांची मुलगी गणपतीच्या फोटोफ्रेम मुळे वाचल्यात.

Updated: Jul 26, 2017, 01:41 PM IST
घाटकोपर दुर्घटना : 'देव तारी त्याला कोण मारी'चा पुन्हा प्रत्यय title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : सिद्धीसाई इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १७ जणांचा मृत्यू झालाय.. पण जे वाचले त्यांच्याही कहण्या धक्कादायक आहेत. इमारतीत राहणाऱ्या वंदना सिंग आणि त्यांची मुलगी गणपतीच्या फोटोफ्रेम मुळे वाचल्यात.

फ्रेमनं वाचवला जीव...

घाटकोपर श्रेयस सिनेमा जवळची सिद्धीसाई इमारत २५ जुलैला सकाळी १०.३० च्या सुमारास एका एका कोसळली आणि सर्वत्र धावपळ सुरु झाली... ही इमारत पडण्याआधी काही वेळापूर्वीच या इमारतीत राहणाऱ्या वंदना सिंग या आपल्या मुलीसोबत मुलीच्या शाळेत सांगिलेल्या प्रोजेक्टसाठी गणपती बप्पाचा फोटो आणायला बाहेर पडल्या होत्या पण त्या परत येण्याआधीच त्या राहत असलेली सिद्धीसाई इमारत कोसळली होती...

वंदना सिंग या सकाळीच ९.३० च्या सुमारास आपल्या मुलीला शाळेच्या प्रोजेक्टसाठी लागणारा गणपती बप्पाचा फोटो आणण्यास घरा बाहेर पडल्या होत्या... गणपतीचा फोटो त्यांनी आणलाही... पण इमारतीच्या खाली येताच त्यांच्या मुलीने तो गणपती बाप्पाचा फोटो वेगळा हवा होता... शाळेतून सांगितलेला फोटो असा नाही... हे सांगितल्यावर त्या पुन्हा त्या दुकानात गेल्या... आणि काही मिनिटांतच त्यांची इमारत पडल्याचा त्यांना फोन आला...

चौथ्या मजल्यावरून कोसळूनही महिला जिवंत

वंदना सिंग प्रमाणेच याच इमारतीत राहणारे लालचंद रामचंदणी आणि त्यांच्या पत्नीचा जीव देखील या दुर्घटनेत चमत्कारी रित्या वाचलाय... रोज ११ नंतर घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या आपल्या दुकानात जाणारे लालचंद रामचंदाणी हे २५ जुलैला काही कामा निमित्त सकाळी ९ वाजताच बाहेर पडले त्यामुळे ते या दुर्घटनेपासून वाचले... तर, त्यांची ७० वर्षांची पत्नी मात्र ही घटना घडली तेव्हा घरातच होत्या... सिद्धी साई इमारतीत त्या चौथ्या मजल्यावर राहतात... जेव्हा इमारत पडली तेव्हा ती पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याप्रमाणे कोसळली आणि इमारतीचा चौथा मजला आहे तसा ढिगाऱ्यावर राहिला... यातच लालचंद रामचंदानी यांच्या पत्नी होत्या.

सिद्धी साई इमारतीची घटना ही सुनिल सितापच्या दादागिरीमुळे सुरु असलेल्या कामामुळे झाली, हे आता स्पष्ट झालंय. पण, त्यामुळे १७ लोकांचे प्राण गेले १६ जण जखमी झाले... १६ कुटुंब उद्धवस्त झाले... याला जबाबदार असणाऱ्या सुनिल सितापवर खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशा मागणी रहिवाशांनी केलीय.