Ganeshotsav 2023 : दहा दिवसांच्या पाहुणाचारानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपतीबाप्पाला मोठ्या भक्तीभावाने निरोप (Ganpati Immersion) दिला जाईल. 28 सप्टेंबर म्हणजे गुरुवारी अनंद चतुर्दशी आहे. दहा दिवसांच्या गणपतीची गुलाल उधळत-ढोलताशांच्या गजरात विसर्जनासाठी मिरवणूक निघेल. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेबरोबरच (Mumabi Municipal Corporation) मुंबई पोलिसांकडून (Mumbai POlice) विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
ट्रेनिंगआधीच ड्युटीवर
मुंबई पोलीस प्रथमच बंदोबस्तासाठी ट्रेनिंग न झालेल्या 600 नव्या जवानांना जुंपणार आहे. मुंबईत अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला जातो. मात्र मुंबई पोलीस दलात तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने यावर्षी नुकत्याच भरती झालेल्या 600 रिक्रुटांना कामावर लावलं जाईल. विशेष म्हणजे 10 महिन्याचं खडतर ट्रेनिंग सुरू होण्याआधीच या 600 जणांना बंदोबस्ताच्या कामावर रुजू करण्यात आलंय. या सर्वांना एका आठवड्याचं बेसिक ट्रेनिंग देण्यात आलंय,
तसंच त्यांच्यासाठी गणवेशही तयार करण्यात आलाय. मोठ्या जबाबदारीचं काम त्यांना दिलं जाणार नाही तर केवळ वाहतूक नियमन, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त अशी कामं त्यांना दिली जातील. या 600 जणांच्या राहण्याजेवण्याची सोय कलिना इथे करण्यात आलीय. कोरोना संकटामुळे 2019 ते 2021 या तीन वर्षात भरती रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झालीय. दरम्यान गणपती विसर्जनाच्या निमित्ताने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारणास्तव रजेवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे.
भाविकांसाठी रेल्वेची व्यवस्था
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी चौपाटीवर येणा-या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनानं 18 विशेष लोकल फे-यांची सोय केलीये. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर या जादा लोकल चालवल्या जाणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
पुण्यात नवे नियम
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल ताशा पथकांवर पोलिसांकडून मर्यादा घालण्यात आलीय. एका पथकात ५० ढोल आणि १५ ताशांनाच परवानगी देण्यात आलीय. तसंच पुण्यातील गणेश मंडळांना बेलबाग चौक, सेवासदन चौक आणि टिळक चौकात वादनासाठी प्रत्येकी १० मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आलीय. चंद्रपुरात गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आलीय. यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दाताळा मार्गावरील इरई नदीवर गणेश विसर्जन होणारेय.