गणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. 

Updated: Sep 1, 2020, 06:45 AM IST
गणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. रस्त्यावर गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं प्रशासनाचं आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनावर सरकारनं यंदा अनेक निर्बंध घातलेत. मात्र अनंत चतुर्दशीला विसर्जन शांततापूर्ण वातावरणात पार पडावं, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत. सुमारे ३५ हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी मुंबईत तैनात करण्यात आलेत. 

त्याशिवाय वाहतूक विभाग, सशस्त्र दल,  राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, आर ए एफ, बी डी एस, होमगार्ड तसेच समाज सेवा संस्थांची देखील मदत घेतली जात आहे. सुमारे ५ हजार पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे. दरम्यान, विसर्जनासाठी गणेशभक्तांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दी करु नये तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पाळण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात गणेश विसर्जनासाठी महापालिकेने जवळपास ९१ फिरते हौद बनवले आहेत.त्यामुळे घरगुती गणपती विसर्जन फिरत्या हौदात किंवा घरातच करण्यात येणार आहे.तर सार्वजनिक गणेश मंडळ मंडपात करणार आहेत.पुण्यातील मानाच्या गणपतीसह दगडूशेठ गणपतीही मंदिरात विसर्जन करणार आहेत.