'गणेशमूर्तींच्या उंचीवर यंदा मर्यादा', मंडळांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

यंदा सार्वजनिक गणेशमूर्तीची उंची किती? दोन दिवसांत निर्णय येणार

Updated: Jun 20, 2020, 08:21 PM IST
'गणेशमूर्तींच्या उंचीवर यंदा मर्यादा', मंडळांसोबतच्या बैठकीत  मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीवर मर्यादा घातल्या जाणार आहेत. राज्य सरकारकडून लवकरच यासंदर्भातील निर्देश जारी केले जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीतील सविस्तर तपशील आता समोर आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, यंदाचा गणेशोत्सव आपण साधेपणाने साजरा करणार आहोत. त्यामुळे गणेश मूर्तीच्या उंचीबाबत योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. 

कोरोनाच्या संकटात असा होणार मुंबईतला गणेशोत्सव

होळीनंतर राज्यात कोरोनाचे संकट आले आहे. यानंतर सर्वधर्मीयांनी सरकारला सहकार्य केले आहे. आपण वारी सुरक्षित पार पाडतोय. तसाच गणेशोत्सवही सुरक्षेचे भान राखून साजरा झाला पाहिजे.गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणेकरून सुरक्षेचे अनेक प्रश्न सुटतील, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना या बैठकीत केल्याचे समजते. 

'परळचा राजा' गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय; यंदा २३ फुटांऐवजी फक्त तीन फुटांची मूर्ती

उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या राहतील. त्यामुळे सुरक्षित उत्सव साजरा होणे गरजेचे आहे. कृत्रिम तलावात सहजपणे विसर्जन करता येईल, एवढीच गणेशमूर्तीची उंची असावी. यावर्षी आपल्या गणेशमूर्तीची उंची कमी करून आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात. मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्याशी बोलून पुढील दोन दिवसांत गणेश मूर्तींची उंची किती असावी हा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना सांगितले होते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.