मुंबई : गेले काही दिवस मुंबईसह नवी मुंबई शहरालाही धुरक्याने विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन, हृदय, घसा, अॅलर्जी अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिली तर, नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर आजाराला सामोरे जावे लागू शकते.
ओखी वादळामुळे अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे सध्या शहरात धुर, धुके आणि धुरक्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे असे की, सर्वसामान्यपणे नागरिकांना धुके आणि धुरके यातील फरक लक्षात येत नाही. त्यामुळे धुरक्यालाही धुके समजून नागरिक त्यात दैनंदिन कामे करत असतात. जसे की, व्यायाम, मॉर्निंग वॉक वैगेरे. या प्रकारामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, श्वास गुदमरने असा प्रकारचा प्राथमिक त्रास संभवतो.
हिवाळ्यामुळे निर्माण झालेले धुके, हवेतील वाढलेली आद्र्रता आणि कारखान्यांतून निघणारा धूर यामुळे नवी मुंबईत सर्वत्र धुरके निर्माण होत आहे. धूळही मोठय़ा प्रमाणात उडत आहे. या सर्व प्रकाराबाबद तज्ज्ञाचा सल्ला घेतला असता ते काळजी घेण्याचा सल्ला देतात. शहरात झपाट्याने वाढत असलेले औद्योगिकरण, इमारतींचे बांधकाम, धूर, रस्त्यावरील वाहनांमुळे होणारे प्रदुषण आदी गोष्टींमुळे बाहेर पडणार धूर आणि धूळ हिवाळ्यातील धुक्यात मिसळते. यामुळे धुरके तयार होते.
दरम्यान, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळही प्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला पुरेसे यश मिळताना दिसत नाही.