मुंबई : कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे. काही विशेष गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. मुंबईहून पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरसाठी काही गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्या शुक्रवार ९ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेअभावी कोंडीत सापडलेल्या राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मध्य रेल्वेकडून मिळणार आहे. पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्ये रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बंद करण्यात आलेली प्रवासी रेल्वेसेवा हळूहळू रूळावर येत आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Five pairs of daily special trains to be run between Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai and Nagpur, Pune, Gondia and Solapur from 9th October: Central Railway
— ANI (@ANI) October 7, 2020
राज्यातंर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात परवानगी दिली होती. त्यानंतर पाच जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याआधी कोकण रेल्वे मार्गावर दादर ते सावंतवाडी दरम्यान, तुतारी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. आता आणखी पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु होत आहेत.
पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे. दररोज परतीसाठी पाच विशेष रेल्वे धावणार आहे. या गाड्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटतील. नागपूर, पुणे, गोंदिया आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
डेक्कन क्वीन, इंद्रायणी, नागपूर दुरांतो, विदर्भ आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या ९ ऑक्टोबरपासून धावणार आहेत. या गाड्या कोरोना काळात विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी गुरुवार, ८ ऑक्टोबरपासून आरक्षण उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे गाडीत प्रवेश करताना, प्रवास करत असताना आणि उतरण्याच्या ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगानं सर्व नियम पाळणे गरजेचे आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.