१३ तासांनंतर पश्चिम रेल्वेवर पहिली ट्रेन धावली

तब्बल १३ तासानंतर मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली ट्रेन धावली. 

Updated: Jul 3, 2018, 08:53 PM IST

मुंबई : तब्बल १३ तासानंतर मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली ट्रेन धावली. अंधेरी ते चर्चगेट अशी ही ट्रेन अंधेरी स्टेशनवरून ८.२५ त्या सुमारास निघाली. सकाळी ७ च्या सुमारास अंधेरी रेल्वे स्टेशनवरचा पादचरी पूल कोसळला. हा पूल कोसळल्यामुळे सकाळपासून पश्चिम रेल्वे ठप्प होती. रेल्वे ट्रॅकवर पुलाचा पडलेला ढिगारा उचलण्यात आला तसंच तुटलेल्या ओव्हरहेडचं कामही पूर्ण करण्यात आलं, त्यानंतर ही ट्रेन धावली. पश्चिम रेल्वे पूर्णपणे ठप्प असल्याचा फटका लाखो कर्मचाऱ्यांना बसला.

रेल्वेमंत्र्यांकडून पाहणी 

मुंबईतल्या ४४५ पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. पुढच्या ६ महिन्यांमध्ये पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं गोयल म्हणाले. तसंच या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आजच्या दुर्घटनेबद्दल पियुष गोयल यांनी खेद व्यक्त केला आहे. रात्री ८ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु होईल, असं वक्तव्य गोयल यांनी केलं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून याचा रिपोर्ट १५ दिवसात येईल, असं गोयल यांनी सांगितलं.

मोटरमनचा गौरव करणार

मोटरमन चंद्रशेखर सावंत यांचा गौरव करण्यात येणार असून त्यांना ५ लाख रुपयांचं इनाम देण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली. सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी बोरिवलीवरून सुटणारी लोकल होती. पूल कोसळत असताना पाहताच मोटरमननं लोकल थांबवली. मोटरमन सावंत यांनी आर्मीमध्ये सेवा केली आहे. मोटरमननं प्रसंगावधान दाखवून गाडी थांबवल्यामुळं मोठी जीवितहानी टळली.