सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर

Firing On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 16, 2024, 08:02 AM IST
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर title=
रविवारी सलमानच्या घरावर झालेला गोळीबार

Firing On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना मुंबईच्या गुन्हे शाखेने गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक केली आहे. मागील दोन दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या मागावर होते.

गुजरातमधून करण्यात आली अटक

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर रविवारी सकाळी गोळीबार झाला. हा गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्सला गजाआड करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. गोळीबार करुन मुंबईतून पळून गेलेल्या या दोघांनाही गुजरातमधील भूज शहरातून अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. या दोघांना मंगळवारी दुपारी मुंबईतील किल्ला कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या विदेशी बनवाटीच्या पिस्तूलासही जिवंत काडतुसे, मोबाईल आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या दोघांनीच सलमान खान याच्या घरासमोर हवेत गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी गँगस्टर रोहित गौदारचा खास माणूस

अटक करण्यात आळेल्या आरोपींपैकी एकाचे नाव विशाल ऊर्फ कालू असे आहे. कालू हा गँगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. कालू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. कालू मूळाचा हरियाणाच्या गुरुग्रामचा रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकमध्ये एका भंगार व्यापार्‍याची गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्याप्रकरणामध्येही कालू प्रमुख आरोपी आहे. 

एकूण 5 गोळ्या झाडल्या

सलमान खानच्या गॅलेक्स येथील निवासस्थानाबाहेर 14 एप्रिलला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या. यापैकी 2 गोळ्या इमारतीच्या भिंतीला लागल्या. एका गोळीचं कवच तर सलमानच्या घरात सापडलं. झाडण्यात आलेल्या 5 गोळ्यांपैकी एक गोळी घराच्या खिडकीला लागली. बाल्कनीमधील जाळीला एक गोळी लागली. या हल्ल्यानंतर सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सदर हल्ल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारासंदर्भातील तपास सुरु असल्याचं सांगितलं होतं. या गोळीबाराची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हल्ला झाला त्या दिवशीच सलमान खानबरोबर फोनवरुन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांबरोबरही यासंदर्भात चर्चा करुन सखोल तपासाचे आदेश दिले होते.

सलमानच्या घरावर झालेल्या हल्लाचे सीटीटीव्ही फुटेज समोर आलं असून यामध्ये गोळीबार केल्यानंतर दुचाकीवरुन भरधाव वेगात निघून गेलेले हल्लेखोर दिसत आहेत.