दादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Updated: Oct 12, 2018, 12:26 PM IST
दादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू title=

मुंबई: दादर स्थानकाबाहेर असलेल्या फूल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फूल मार्केटच्या परिसरात सकाळच्या वेळेत बरीच गर्दी असते. त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज मौर्य (३५) असे आहे. सकाळी सातच्या सुमारास ते प्रमोद महाजन उद्यानाजवळून जात असताना दोन बाईकस्वार याठिकाणी आले. त्यांनी मनोज यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी मौर्य यांच्या पाठीवर लागली. त्यानंतर बाईकस्वार येथून फरार झाले. 

यानंतर मौर्य यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सध्या शिवाजी पार्क पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.