कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं

कोरोनावरील रेडीमसवीर, टोसीलिझुमाब या इंजेक्शन्सचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

Updated: Jul 22, 2020, 03:37 PM IST
कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन खबऱ्यांचं जाळं उभारत आहे. खबऱ्यांसाठी अन्न आणि औषध प्रशासनने १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

कोरोनावरील रेडीमसवीर, टोसीलिझुमाब या इंजेक्शन्सचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात FDA आणि गृहविभागाकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबई आणि परिसरात तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. 

ठाणे, मुलुंड, मीरा रोड भागात कारवाई करण्यात आली आहे. मीरा रोड येथे झालेल्या कारवाईत २ जणांना अटक करण्यात आली. तसंच या कारवाईत २ रेडीमसवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली असून ५४०० रुपयांचं हे एक इंजेक्शन आहे. तर मुलुंड येथील कारवाईत रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मुलुंडमध्ये १३ रेडीमसवीर जप्त करण्यात आली असून एक इंडेक्स ३० हजार रुपयाला विकत होते. 

टोसीलिझुमाब हे इंजेक्शन भारतात बनत नाही. ते बाहेरुन येत असल्याने त्याचा पुरवठा कमी आहे. आता याच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे. रेडीमसवीरचा पुरवठाही आता वाढला आहे. तरीही याचा काळाबाजार सुरु असल्याच्या तक्रारी येत असून त्याविरोधात कारवाई सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.