राज्य सरकारच्या विनंतीनंतर तूर खरेदीला केंद्राची मुदत वाढ

महाराष्ट्रासाठी तूर खरेदीची मुदत १५ मे पर्यंत वाढविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्रीय कृषिमंत्र्यांचे विशेष आभार

Updated: Apr 24, 2018, 05:31 PM IST
राज्य सरकारच्या विनंतीनंतर तूर खरेदीला केंद्राची मुदत वाढ title=

मुंबई : केंद्र सरकारनं राज्याच्या विनंतीनंतर काल संध्याकाळी राज्यातील तूर खरेदीची मुदत १५ मे पर्यंत वाढवली आहे.किमान आधारभूत किंमतीनं तूर खरेदीच्या योजनेची मुदत १८ एप्रिलला संपली. त्यानंतर राज्य सरकारनं केंद्राकडे ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता ही मुदत वाढवण्यात आली असून, त्यामुळे राज्यातील तूर उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. याविषयी केंद्राच्या निर्णयाचं पत्र राज्याला मिळालं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शिवाय शेतक-यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

किमान आधारभूत दर योजनेंतर्गत २०१७-१८ या हंगामासाठी तूर खरेदीची मुदत राज्य शासनाच्या विशेष विनंतीवरून महाराष्ट्रासाठी १५ मे २०१८ पर्यंत वाढवून दिल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. यामुळे अधिकाधिक संख्येने शेतकर्‍यांना त्यांच्या तुरीला आश्वासित किंमत मिळू शकणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्राकडून राज्याला पत्र मिळाले

राज्यात हमीभावाने तुर खरेदीची मुदत १८ एप्रिल पर्यंत होती. राज्य शासनाने तूर खरेदीची मुदत वाढवण्यासाठी केंद्राकडे विनंती केली होती. त्यानुसार केंद्राने ही मुदत वाढ दिली आहे. तसे पत्र आज राज्य शासनाला प्राप्त झाले. राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल केंद्रीय कृषीमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.