मुंबई : राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी सुकाणू समितीने आजपासून पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१ नोव्हेंबरपासून राज्यभरात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
या आंदोलनात महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकणे, तसेच तोडलेली वीजजोडणी शेतकऱ्यांनी स्वतः जोडून घेणे, असे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सुकाणू समितीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत मंगळवारी बैठक झाली. यावेळी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनांची माहिती देण्यात आली.
आज, १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत तीन टप्प्यांत राज्यभरात तीन प्रकारची आंदोलने करण्याचा इशारा समितीने दिला आहे. नोटाबंदीचा निषेध करण्यासाठी ८ नोव्हेंबरला सर्व तहसील कचेऱ्या व बँकासमोर शेतकरी सरकारचे वर्षश्राद्ध घालतील, असा इशारा समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांनी दिला आहे.
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी
- कर्जमाफीत पीक कर्जासह शेडनेट पॉलिहाऊस, जमीनसुधारणा कामांसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश करावा
- क्रूड पाम, रिफाइंड पाम तेलांवर आयात शुल्कात आणखी २० टक्के वाढवावे
- उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये भाव द्यावा