मुंबई : 'मंजुला शेट्येची हत्या केल्यानंतर मंजुलाचं रक्त पुसून टाकण्यात आलं. तसंच अत्याचार करण्यासाठी वापरण्यात आलेली काठी इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आली' असा धक्कादायक खुलासा एका कैद्यानं केलाय.
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेले आमदार रमेश कदम यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. हत्येनंतर संध्याकाळी ६ नंतर दोन कैद्यांच्या मदतीने जेल पोलीस अरूण जाधव आणि बनसोजडे यांनी आरोपी गुलाब यादव, चंद्रकांत यादव, सुभाष यादव आणि आरोपी मंडल यांच्या मदतीने जागा स्वच्छ केली आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप कदम यांनी केलाय. आपल्यासमोर हा प्रकार घडल्याचं आमदार कदम यांनी म्हटलंय.
या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींना किला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी पोलीस इच्छूक नसल्याचं दिसून आलं.
हत्या करण्याकरता वापरण्यात आलेलं हत्यार आणि इतर महत्वाचे पुरावे मिळून आले नाही, असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले होते. तर गेल्या सुनावणी वेळेस आणखी आरोपी निष्पन्न झालेत. आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत, हत्यार शोधायचे आहे आणि आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत, असा युक्तीवाद करण्यात आला होता.
परंतु, यापैंकी एकाही मुद्द्यांवर यावेळी चर्चादेखील करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रांच जेल पोलिसांना पाठीशी घालतय का? असा आरोप केला जातोय.