मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातून दु:ख व्यक्त होतंय. या प्रकरणानंतर अनेकजण भावूक झाले असून ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतायत. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर नैराश्येला सामोरे जात असताना अनेकांच्या मनात आत्महत्येसारखे विचार डोकावतात. पण त्यावर मात करुन बरीच मंडळी पुढे जातात. माझ्या मनात दोन वेळा आत्महत्येचा विचार आल्याचे कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलंय. सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्वीट करत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.
तारुण्यात आणि खासदार झाल्यानंतर अशा दोन वेळा माझ्या मनात आत्महत्येचे विचार आल्याचे मिलिंद देवरांनी म्हटलंय. पण यावर आपण कशी मात केली हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय. यासाठी त्यांनी पाच सुत्र सांगितली आहेत. तुमचे कुटुंब, मित्र परिवार, सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही यावर मात करु शकता असे ते म्हणाले. नैराश्य, मानसिक आजारावर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन मात करता येऊ शकते. आतल्या नकारात्मकतेशी आपलं द्वंद सुरु असतं, त्या नकारात्मकतेला मोठं होऊ देऊ नका. आयुष्य सुंदर आहे. ते वाचन, संगीत, प्रवास तसेच आवडत्या व्यक्तींसोबत व्यतीत करा. जे तुम्हाला आनंदी ठेवेलं ते निवडा. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:वर प्रेम करा. असे देवरा यांनी ट्वीटरवर म्हटलें.
सुशांतने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा तो घरात एकटाच नव्हता, तर त्याचे काही मित्रही होते, अशी माहितीही समोर येत आहे. पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरातून काही कागदपत्र मिळाली आहेत, यामधून तो डिप्रेशनमधून जात होता, हे दिसत आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली आहे. संशयास्पद असं सध्या तरी काही हाती लागलेलं नाही, असं झोन ९ चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले.
My own experience with suicidal thoughts, first as a teen & even as an MP, taught me to live with the blues. Sharing 5 effective coping tools... pic.twitter.com/yMiVfAgC9U
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) June 14, 2020
पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या सोशल मीडियाचाही तपास केला जात आहे. सुशांत बऱ्याच कालावधीपासून सोशल मीडियापासून लांब आहे. सुशांतने शेवटचं ट्विट २७ डिसेंबर २०१९ ला केलं होतं. यानंतर तो ट्विटरवर ऍक्टिव्ह नव्हता. इन्स्टाग्रामवर त्याने शेवटची पोस्ट ३ जूनला केली होती. या पोस्टमध्ये त्याने आईचा फोटो शेयर केला होता.
काहीच दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती.