महेश मांजरेकरांच्या चित्रपटात अंडरवर्ल्डचा पैसा? ईडीची धाड पडल्यामुळं खळबळ

ED Raid on Qureshi Productions : ऑनलाइन सट्टेबाजीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूडच्या एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कुरेशी प्रॉडक्शनने हा चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसे घेतले होते.

आकाश नेटके | Updated: Oct 7, 2023, 11:12 AM IST
महेश मांजरेकरांच्या चित्रपटात अंडरवर्ल्डचा पैसा? ईडीची धाड पडल्यामुळं खळबळ title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात (Mahadev Betting App) अंमलबजावणी संचालनालय (ED) अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. याप्रकरणी ईडीची कारवाई सुरूच आहे. ईडीने आता याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ईडीने बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापे टाकले आहेत. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ईडीने शुक्रवारी कुरेशी प्रॉडक्शनच्या (Qureshi Productions) कार्यालयात आणि अंधेरीतील इतर पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंडरवर्ल्डमधून या बॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसला वित्तपुरवठा करत आहे. 

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी प्रॉडक्शनला महादेव अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून चित्रपट बनवण्यासाठी वित्तपुरवठा झाला होता. कुरेशी प्रॉडक्शन हे वसीम आणि तबस्सुम कुरेशी यांचे आहे.एका मोठ्या बजेटमधील ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये बॉलीवूडच्या महत्त्वाच्या स्टार गुंतले आहे. हा चित्रपट प्रादेशिक भाषेत बनवला जात असून इतर अनेक भाषांमध्ये डब केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अंधेरी आणि इतर काही ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. वसीम कुरेशीची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत असून त्याच्या प्रवासाचे तपशील आणि आर्थिक माहिती पडताळली जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हा चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचाच आहे. महादेव ऍप बेटींग प्रकरण. ईडीची मुंबईत कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर धाड मारली आहे. कुरेशी प्रॉडक्शन हाऊस बॉलिवूडमधील मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे. महेश मांजरेकर यांचा आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातही कुरेशी प्रॉडक्शन हाऊसची महत्वाची भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक दिग्गज बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांसोबत कुरेशीचे फोटोस समोर देखील आले आहेत. त्यामुळे आता महेश मांजरेकर यांचा चित्रपट अडचणीत येणार का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. या कलाकारांना वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याच प्रकरणात ईडीने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला यापूर्वीच समन्स पाठवले असून त्याला  ऑक्टोबर रोजी रायपूर विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ईडी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांचा जबाब नोंदवणार आहे. या कलाकारांनी महादेव अॅपची जाहिरात केल्याचे समजते. काही कलाकारांनी अॅपच्या प्रवर्तकांपैकी एकाच्या लग्नात पाहुण्यांचे मनोरंजन केले होते.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात शूरवीर मावळ्यांची कथा पाहायला मिळणार आहे. अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.