ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : होळीच्या वेळी एकमेकांच्या नावानं बोंबा मारून शिमगा करण्याची प्रथा आहे.. पण महाराष्ट्रात सध्या राजकारण्यांनी रोजच शिव्यांचा शिमगा सुरू केला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडता झाडता शिव्या देण्यापर्यंत त्यांनी मजल मारलीय.
एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधकांचा त्यांच्या खास ठाकरी शैलीत समाचार घ्यायचे. पण आता रोखठोक बोलण्याच्या नावाखाली शिवसेनेचे नेते चक्क शिवराळ बोलू लागले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत यात सगळ्यात आघाडीवर आहेत.
संजय राऊत यांची जीभ घसरली. एकदा नव्हे, अनेकवेळा घसरली आहे. आपण रोखठोक बोलत नाही, तर शिवराळ बोलतोय, असं तेच सांगतायत. हे कमी झालं म्हणून की काय, किरीट सोमय्याही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतायत. डिक्शनरीत आहेत तेवढ्या शिव्या एकदाच देऊन टाका, असं तेच सांगतायत...
किरीट सोमय्यांना जोड्यानं मारण्याची भाषा काही दिवसांपूर्वी राऊत यांनी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोमय्या स्वतःच जोडा हातात घेऊन 'मारा, मला जोड्यानं मारा' म्हणत समोर आले.
एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अक्षरशः राजकीय तमाशा सुरू आहे. दर दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांवर आरोप करायचे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करायची. ईडीच्या नावानं धमक्या द्यायच्या... असं सत्रच सुरू झालं आहे.
यातून महाराष्ट्राचं काय भलं होणाराय, हे मात्र कुणालाच माहीत नाहीय. त्यामुळं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं म्हणण्याची वेळ दुर्दैवानं सामान्य जनतेवर आली आहे.