धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता, पक्ष कार्यालयात पोहोचले

राजीनाम्यावर काय म्हणाले धनंजय मुंडे...

Updated: Jan 14, 2021, 02:46 PM IST
धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता, पक्ष कार्यालयात पोहोचले title=

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी देखील मुंडे यांच्यावरील आरोर हे गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजीनामा देण्याची शक्यता वाढली आहे. सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेणार. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पक्ष कार्यालयात येऊन राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. याआधी धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आज संध्याकाळपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा आहे.

मी शरद पवारांना भेटून याआधी सगळी माहिती दिली आहे. मी माझं व्यक्तीगत म्हणणं सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेतृत्व करणारे नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कार्यालयात आल्यावर दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आरोप करण्यात आला आहे. या नंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांनी यानंतर केलेल्या या पोस्टनंतर हा विषय आणखी चर्चेत आला. भाजपने या आरोपामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.