मुंबई : भाजपसोबतची युती ठेवायची का नाही, याचा निर्णय शिवसेनेनं घ्यावा, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शिवसेना आमच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध करते. ते आम्हाला सल्ले देऊ शकतात पण शिवसेना एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. मोदी लाट आता फिकी पडत आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.
राज्यातील भाजप सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त सर्वप्रथम 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले होते. 'मुंबई महापौर निवडीच्या दिवशी भाजपकडं बहुमत असूनही आम्ही आमचा महापौर बसवला नाही... आजही आम्ही ठरवलं तर २४ तासात मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' असा ठोस दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला होता.
मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य शिवसेनेला चांगलंच झोंबलंय... त्यामुळे, अवघ्या काही तासांतच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना स्टाईलनं प्रत्यूत्तर दिलंय.
'पैशांतून सत्ता सत्तेतून पुन्हा पैसा पैशातून पुन्हा सत्ता... काँग्रेस हेच करत आली शेवटी त्यांची माती झाली... मुंबईने अशा बादशाहांची माती केलीय...' असं राऊतांनी ट्विटरवर म्हटलंय.
इतकंच नाही तर, 'मुख्यमंत्री म्हणून बेळगावसह मराठी सीमा भाग महाराष्ट्रात आणायची हिंमत दाखवा... उद्धव ठाकरे स्वतःच मुंबईचे महापौरपद इनाम म्हणून झोळीत टाकतील' असा जळजळीत टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणलाय.